नवी दिल्ली : 'चहावाला पंतप्रधान बनू शकत नाही' असे म्हणत राजकीय वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरले आहेत. मोदींना उद्देशून 'नीच' असा शब्द मणिशंकर अय्यर यांनी वापरला. मोदींनी अय्यर यांना प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत माफीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मणिशंकर अय्यर नेमकं काय म्हणाले?
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?", असे मणिशंकर अय्यर म्हणाले.
पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर
सुरतमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
"उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत. माझ्यासारख्याने चांगले कपडे परिधान केल्याचे मुघल संस्कार असणाऱ्यांना बघवत नाहीत. मी भलेही खालच्या जातीतला असेन, मात्र काम उच्च आहेत.", असे मोदी म्हणाले.
"गुजरात निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मला भलेही त्यांनी नीच म्हटलं असेल, पण कुणीही त्यांच्याविरोधात मर्यादांचं उल्लंघन करु नका. गुजरात आणि भाजपचे असे संस्कार नाहीत. मणिकशंकर यांचे शब्द त्यांनाच लख लाभो. 9 आणि 14 डिसेंबर रोजी कमळाला मत देऊन 'नीच'चं उत्तर द्या.", असेही मोदी यांनी आवाहन केले.
राहुल गांधी काय म्हणाले?
भाजप आणि पंतप्रधान मोदी कायमच काँग्रेसविरोधात घाणेरडी भाषा वापरत असतात. मात्र, काँग्रेसचे संस्कार आणि वारसा वेगळा आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी.", असे म्हणत राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांचा माफीनामा
सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली आहे. "मी इंग्रजीतील 'Low' शब्दाचा अनुवाद 'नीच' असा केला होता. हिंदी ही माझी मातृभाषा नाही. तरीही चुकीचा अर्थ निघाला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो.", असे म्हणत मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Dec 2017 05:34 PM (IST)
मोदींना उद्देशून 'नीच' असा शब्द मणिशंकर अय्यर यांनी वापरला. मोदींनीही अय्यर यांना प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत माफीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -