Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराचं (Violence) सत्र सुरु असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur) शांतता काही केल्या निर्माण होत नाही. गुरुवार (03 ऑगस्ट) रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्वकच आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये गोळीबार आणि बेशिस्त जमावाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राज्याच्या कौत्रुक, हरोथेल आणि सेंजम चिरांग या भागात झालेल्या गोळीबारामध्ये एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. राज्यातील हिंसाचाराच्या या घटना ताज्या असतानाच काही वेळा पूर्वी मणिपूरमधील जातीय हिंसाचारामध्ये मारल्या गेलेल्या कुकी आणि मेतई लोकांचा सामूहिक दफनविधी थांबवण्यात आला होता. 


सुरक्षा रक्षकांना थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरले लोक


राज्यामध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी अत्यंत तणावपूर्वक स्थिती होती. विष्णुपूरमध्ये तर जवळपास 600 लोकं सुरक्षारक्षकांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात झालेल्या या जमावामुळे पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली. यामध्ये 25 जणं जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या संतप्त जमावाने अनेक ठिकाणी हल्ला केला असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संवेदनशील परिसरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सुरक्षा बल देखील तैनात करण्यात आले आहेत. 


हजारो लोक पोलिसांच्या ताब्यात


वृत्तानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकूण 129 पोलीस चौकी उभारण्यात आलेल्या आहेत. तसेच आतापर्यंत पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल सुमारे  1,047 लोकांना ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या बनावट व्हिडिओंपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांना नागरिकांना केला आहे. तसेच लोकांनी लुटलेली  शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पोलिसांना परत करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.  


मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यावर ससंदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील घमासान सुरु आहे. तर विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यावर अविश्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर या प्रस्तावावर संसदेत 8 आणि 9 ऑगस्ट रोजी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मुद्द्यावर 10 ऑगस्ट रोजी संसदेत भाष्य करणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या इंडियाचे शिष्टमंडळ देखील मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तिथे जाऊन मणिपूरमधील परिस्थिती आढावा घेतला. 


हेही वाचा : 


No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर 8 आणि 9 ऑगस्टला चर्चा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत देणार उत्तर