Zaira Wasim: एकेकाळी बॉलिवूडमध्ये ‘दंगल’सारख्या गाजलेल्या चित्रपटातून ओळख मिळवणारी अभिनेत्री झायरा वसीम आता चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी सामाजिक मुद्द्यांवर ती सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून तिने तीव्र नाराजी व्यक्त केली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करत संताप व्यक्त केलाय.(Zaira Wasim)

Continues below advertisement

झायराने x वर शेअर केलेल्या पोस्टमधून मुख्यमंत्र्यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला. पाटणामधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर केवळ झायराच नव्हे, तर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

सोमवारी पाटणामध्ये आयोजित कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या 1000 हून अधिक AYUSH डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देण्यात येत होती. याच कार्यक्रमात एका महिला डॉक्टरला मंचावर नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी आल्या. त्या वेळी त्यांनी हिजाब परिधान केला होता.

मंचावर आल्यानंतर नितीश कुमार यांनी आश्चर्य व्यक्त करत स्वतःच त्यांचा हिजाब खाली ओढल्याचे व्हिडिओत दिसते. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. घडलेल्या प्रकारानंतर संबंधित डॉक्टर गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आल्या आणि एका अधिकाऱ्याने त्यांना तात्काळ बाजूला नेले.

झायरा वसीम काय म्हणाली?

या घटनेवर प्रतिक्रिया देताना झायरा वसीमने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेशी किंवा विनम्रतेशी खेळ केला जाऊ नये, विशेषतः सार्वजनिक मंचावर तर अजिबातच नाही. एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा नकाब अशा प्रकारे ओढला जाताना पाहणं अत्यंत संतापजनक असल्याचं तिने नमूद केलं. सत्तेत असणं म्हणजे मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नसतो, असं सांगत तिने नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली.

 

मंचावरील इतर प्रतिक्रिया

या घटनेदरम्यान नितीश कुमार यांच्या शेजारी उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांची बाही ओढत थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडिओत दिसते. तसेच, मंचावर उपस्थित असलेले बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार हसताना दिसल्यानेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 राजकीय वर्तुळात खळबळ

व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षांनीही या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. महिलेच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्तनावर सवाल उपस्थित केले आहेत.