गाझियाबाद : सुरक्षारक्षकांनी अडवल्यानंतरही उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधल्या हिंदन एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमावर गोळी झाडण्यात आली. या घटनेत तो बेशुद्ध झाल्यानंतर हिंदन एअरफोर्सच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं.
या घटनेनंतर एअरबेस आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. संशयिताचं नाव सुजीत असून तो आनंद विहारमध्ये मोलमजुरी करुन पोट भरतो. सुजित मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगढचा रहिवासी आहे. सुरक्षा यंत्रणा त्याची अधिक चौकशी करत आहेत.
सुजितने एअरबेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न का केला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र दोनच दिवसांपूर्वी एअरबेसवर हल्ला होण्याची माहिती मिळाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
हिंदन एअरफोर्स स्टेशन हे वेस्टर्न कमांडचा भाग आहे. हे आशियातील सर्वात मोठं, तर जगातील आठव्या क्रमांकाचं एअरबेस आहे. 55 चौरस किलोमीटरवर हा एअरबेस पसरलेला आहे.
पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वेस्टर्न कमांडच्या कोणत्याही एअरबेसवर अवैधपणे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांवर गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.