नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे .32mm ची जिवंत काडतुसं सापडली आहेत. काही दिवसांपूर्वी सचिवालयात केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची हल्ल्याबाबत दिल्ली विधानसभेने विशेष सत्र बोलावले होते. हे सत्र केजरीवाल यांच्या घरासमोरच सुरु होते. त्यावेळी जिवंत काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी केलेल्या चेकिंगदरम्यान एका व्यक्तीच्या पाकिटामध्ये जिवंत काडतूस सापडली आहेत. या व्यक्तिचे नाव मोहम्मद इम्रान आहे. त्याला अटक करुन पोलीस सध्या इम्रानची चौकशी करत आहेत.

इमरान हा सीलमपूर येथील रहिवाशी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. इम्रानसोबत आणखी 12 जण या सत्राला हजर होते. इम्रान आणि त्याच्यासोबतचे 12 जण दिल्ली वक्फ बोर्डामध्ये कार्यरत असल्याचे इम्रानने सांगितले. दिल्ली वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी ते केजरीवाल यांना भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती इम्रानने पोलिसांना दिली.

मोहम्मद इम्रानकडे जिवंत काडतूस सापडल्याने अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती. या दोन प्रकरणांमुळे केजरीवालांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.