Mamata Banerjee Washing Machine Protest : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अनोखं आंदोलन करत भाजपवर (BJP) टीका केली आहे. व्यासपीठावर वॉशिंग मशीन (Washing Machine) ठेवत ममता यांनी भाजपविरोधात निदर्शनं केली. कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसने मंचावर प्रतिकात्मक वॉशिंग मशीन त्याला 'भाजप वॉशिंग मशीन' (BJP Washing Machine) असं नाव दिलं. या वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले काळे कपडे पांढरे शुभ्र होऊन निघतात. असं प्रात्यक्षिकही ममता बॅनर्जी यांनी करुन दाखवलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


ममतांचा भाजपवर वार, व्यासपीठावर अनोखं आंदोलन


ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. बुधवारी, 29 मार्च रोजी तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात वॉशिंग मशीन आंदोलन केलं. यावेळी ममता बॅनर्जी वेगळ्या अंदाजात दिसल्या. ममता बॅनर्जी यांनी वॉशिंग मशीनमध्ये काळे कपडे टाकले आणि ते पांढरे होऊन निघाले. ममता आणि त्यांच्या पक्षाकडून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं. भाजपच्या राजवटीत केंद्रीय यंत्रणांद्वारे विरोधकांचा छळ केला जातो, परंतु विरोधी पक्षाचा नेता भाजपमध्ये सामील होताच तो निर्दोष ठरतो, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.


'BJP वॉशिंग मशीन... काळे कपडे होतील पांढरे'






तृणमूल काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओही तृणमूल काँग्रेसने ट्विट केला आहे. ही 'भाजपच्या वॉशिंग मशीनची जादू' असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी, निदर्शनादरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी 'भाजप वॉशिंग मशीन' अशा घोषणा दिल्या.


ममता बॅनर्जी यांचा भाजपवर निशाणा


मीडिया रिपोर्टनुसार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात दोन दिवसीय धरणे आंदोलन पुकारलं. धरणे आंदोलन सुरू करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "भाजप वॉशिंग मशीन बनले आहे. चोर, दरोडेखोरांची यादी काढा, ते सगळे तिथे (भाजपमध्ये) बसले आहेत. मला संविधानाबद्दल त्यांचे प्रवचन ऐकायचे आहे का?" ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला निषेध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरज पडल्यास मी पंतप्रधानांच्या निवासस्थानीही धरणे धरू शकते."