Law in India for Flying Kites : भारतात पतंग (Kites) उडवणं बेकायदेशीर आहे, असं जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं तर? काही दिवसांवरच मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण आलाय. या दिवशी संपूर्ण भारतात पतंग उडवले जातात. दिल्ली असो वा उत्तर प्रदेश, गुजरात असो वा महाराष्ट्र, मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळीकडेच रंगीबेरंगी पतंगं आकाशात सैर करताना दिसतात. अशातच तुम्हालाही पतंग उडवायचा असेल आणि तेवढ्यात कोणी येऊन सांगितलं की, आधी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल तरच पतंग उडवता येईल. तुमचा यावर विश्वास बसेल? कदाचित नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर तुम्हाला खरोखरंच पतंग उडवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही परवानगीशिवाय पतंग उडवत असाल, तर तो कायदेशीर गुन्हा आहे.


कोणत्या कायद्यानुसार पतंग उडवणं मानला जातो गुन्हा?


परमिटशिवाय पतंग उडवणं हा भारतीय विमान कायदा 1934 नुसार गुन्हा आहे. 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय विमान कायदा 1934 नुसार, जर कोणीही आकाशात पतंग, फुगा किंवा ड्रोनसारखं काही उडवत असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी किंवा परवाना घेणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही पतंग उडवला असेल आणि तो एखाद्या विमानासारखा उडवला गेला असेल, ज्यामुळे जमिनीवर, आकाशात किंवा हवेत जीवित, मालमत्तेची हानी होऊ शकते, असं सिद्ध झालं, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल, तर या कायद्यानुसार शिक्षा होईल. 


पतंगबाजीवर बंदी घालण्याची मागणी 


पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक दिवसांपूर्वी मांजामुळे अनेक व्यक्तींनी जीव गमावला आहे. काही काळापूर्वी अलाहाबादमध्ये एक घटना घडली होती, ज्यामध्ये एक महिला स्कूटीवरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा तिच्या गळ्यात अडकला आणि गळा कापला जाऊन महिलेनं जीव गमावला. अशा अनेक घटना समोर आल्यापासून अनेक स्वयंसेवी संस्था पंतग उडवण्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.


पंतप्रधान आणि सलमान खान यांनीही उडवले पतंग 


आपल्या देशात पतंग उडवणं इतकं प्रचलित आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार सलमान खानही हा मोह आवरु शकले नाहीत. तुम्हाला आठवत असेल की, काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एकत्र पतंग उडवताना दिसले होते.