बेळगाव : बेळगावचे मेजर श्रीहरी कुगजी यांनी जम्मू-काश्मीरच्या हिमस्खलनात मृत्यूला हरवलं. सोनमर्ग इथे कर्तव्य बजावताना हिमस्खलनामुळे मेजर कुगजी बर्फाखाली अडकले होते. पण याच दरम्यान त्यांच्या हाती लागलेल्या कुलूपाने बर्फ फोडून ते बाहेर आले.


सोनमर्गमध्ये हिमस्खलन झाल्याने त्या ठिकाणी असलेलं छप्पर बर्फ कोसळल्यामुळे खाली आलं आणि श्रीहरी कुगजी 15 फुटांच्या बर्फाखाली अडकले.

त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. कुगजी यांच्या हाती ट्रंकला लावायचं कुलूप लागलं. त्या कुलुपाने जमेल तसं बर्फ फोडू लागले. अखेर बोट बाहेर पडण्याइतकी जागा त्यांनी तयार केली आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी मृत्यूला हरवलं.

बचाव आणि शोध कार्यासाठी आलेल्या पथकाला मेजर श्रीहरी कुगजी यांची बोट दिसली आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं.

पण, खराब हवामानामुळे ते अजूनही सोनमर्गमध्येच अडकले आहेत. सध्या सोनमर्गमध्ये रस्त्यावर चार फुटांपर्यंत बर्फाचा थर आहे. तसंच हवामानामुळं हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नाही.

दरम्यान, श्रीनगरमधील बांदीपुराच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 14 जवानांचा मृत्यू झाला आहे. सलगच्या बर्फवृष्टीमुळे 25 जानेवारीच्या संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही जवान हिमस्खलनात अडकले.