लखनौ : महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम राज्यात सगळीकडे उत्साहात पार पडला. पण महाराष्ट्राबाहेरही त्याची झलक पाहायला मिळाली. सध्या सगळ्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशातही महाराष्ट्र दिन साजरा झाला.
लखनौमधल्या या महाराष्ट्र दिनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. लखनौमधल्या राजभवनावर राज्यपाल राम नाईक यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी महाराष्ट्रातून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे देखील उपस्थित होते. एखाद्या राजभवनात दुसऱ्या राज्याचा दिवस साजरा होण्याचा हा योग तसा विरळाच. पण मराठी संस्कृतीवर अपार प्रेम असणाऱ्या राम नाईक यांनी तो जुळवून आणला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात जय महाराष्ट्र या शब्दांनी अभिवादन करतच योगींनी आपलं भाषण सुरु केलं. त्यानंतर सुरुवातीची काही वाक्यंही ते मराठीतूनच बोलले. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या प्रयत्नाला जोरदार साद दिली.
महाराष्ट्र दिनाची प्रेरणा, उत्तर प्रदेश दिन साजरा होणार
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातच योगींनी यापुढे उत्तर प्रदेश दिन साजरा करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. आज यूपीच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याची घोषणाही झाली. 24 जानेवारी 1950 या दिवशीच यूनायटेड प्रांताची उत्तर प्रदेश राज्य म्हणून घोषणा झाली होती.
प्रत्येक राज्याला त्याची अस्मिता, संस्कृती जपण्यासाठी असा दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे, असं राज्यपाल राम नाईक यांचा आग्रह होता. याआधी त्यांनी अखिलेश सरकारलाही अशी विनंती केली होती. मात्र त्यावेळी दुर्लक्षित राहिलेली ही मागणी योगींनी मात्र तातडीने पूर्ण केली.