नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित जात आहे. आता त्यांच्या जोडीला नवे कार्यकारी अध्यक्षही नेमले जाण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे, उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील, विदर्भातून वसंत पुरके, मराठवाड्यातून कैलास गोरंट्याल, कोकणातून हुसेन दलवाई या नावांची चर्चा आहे. येत्या काही दिवसात काँग्रेसमधील बदलांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाने दिली होती. फक्त नाना पटोले यांचं नाव जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. नाना पटोले सध्या दिल्लीत आहेत. आज किंवा उद्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या सगळ्यामध्ये आणखी एक घडामोड म्हणजे प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारी अध्यक्षांचीही निवड होणार आहे. महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रभारींनी सहप्रभाऱ्यांकडून राज्यातील विविध भागातून काही नावं मागवली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे, उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील, विदर्भातून वसंत पुरके, मराठवाड्यातून कैलास गोरंट्याल, कोकणातून हुसेन दलवाई यांची नावं सध्या समोर आली आहेत.


प्रदेशाध्यक्षांसोबत नवे कार्यकारी अध्यक्ष देऊन संघटनेत सोशल इंजिनीअरिंग करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. निवडणुकीच्या आधीही काँग्रसने कार्यध्यक्षांची नेमणूक केली होती. त्यामधील काही जण आता मंत्री झाले आहेत.


यामधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष बदलावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने याबाबत अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत संवाद साधलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.