नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरवेळी रोटेशन पद्धतीनुसार काही राज्यांना संधी मिळते. 2016 साली सुद्धा राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता, त्यानंतर तीन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरचं हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावं लागतं, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते. यावेळी 16 राज्यं आणि 6 केंद्रीय मंत्रालये अशा एकूण 22 चित्ररथांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राकडून रंगभूमीच्या 175 वर्षांच्या प्रवासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव होता. पण तो केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही.





दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच बंगालचाही चित्ररथ यावेळी नाकारण्यात आला आहे. पण बंगालचा चित्ररथ हा केंद्र सरकारनं जाणूनबुजून नाकारल्याची टीका बंगालमधील नेत्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुरु केलेल्या कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव बंगालनं मांडला होता. पण तो सांस्कृतिक मंत्रालयाकडून नाकारला गेला आहे. बंगाल सरकारनं केंद्राच्या नागरिकत्व कायद्याला जोरदार विरोध केल्यामुळेच ही संधी नाकारल्याचा आरोप तृणमूलचे खासदार सौगत राँय यांनी केला आहे. याआधी 2015 मध्येही याच विषयावरचा बंगालचा चित्ररथ नाकारला गेला होता. पण केंद्र सरकारच्या वतीनं मात्र यात काही राजकारण नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मागच्या वर्षी 2019 च्या संचलनात बंगालचा समावेश होता याचीही आठवण अधिकाऱ्यांनी करुन दिली आहे.


दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच त्यानंतर 2018मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता.


संबंधित बातम्या : 


नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; खात्यांमध्ये जमा होणार 11 हजार कोटी रूपये