नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर पॅन कार्डच्या (पर्मनन्ट अकाउंट नंबर) अर्जामध्ये तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय डायरेक्ट टॅक्स बोर्डानं ही माहिती दिली आहे.


बोर्डाचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, 'नोटाबंदीच्या आधी दर महिन्याला 2.5 लाख पॅन कार्डसाठी अर्ज येत होते. पण सरकारनं नोटबंदी लागू केल्यानंतर तब्बल 7.5 लाख अर्ज येऊ लागले आहेत.’

केंद्र सरकारनं मागील वर्षी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर पॅन कार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागानं काळ्या पैशांविरोधात अनेक पावलं उचलणं सुरु केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे दोन लाखांपेक्षा अधिकच्या रोख व्यवहारावर पॅन कार्ड आवश्यक असणार आहे.

आयकर विभागाकडून एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीला 10 अंकी पॅन क्रमांक दिला जातो. याचा उपयोग हा इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) भरण्यासाठी होतो. सध्या देशात 33 कोटी पॅन कार्ड धारक आहेत.