Power Crisis : देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचे संकट अधिक गडद होत आहे. परंतु, विजेच्या या संटकामुळे एखाद्याचं नवं आयुष्य सुरू होतानाच त्याच्या आयुष्यात अंधार येईल अशी कल्पना देखील किती भयानक आहे. परंतु, या वीज संकटामुळे अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. होणाऱ्या वधूसोबत सात फेरे घेत असताना वीज खंडित झाली आणि चक्क वधूंचीच बदली झाल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील उज्जेनमध्ये घडला आहे. वधू बदली झाल्याची चूक लक्षात येताच भटजींनी पुन्हा एकदा खऱ्या वधूसोबत सात फेरे घ्यायला लावून ही चूक सुधारली.
मध्य प्रदेशातील विजेचे संकट गेल्या काही दिवसांपासून गडद होत चालले आहे. त्यामुळे तेथील लग्नसमारंभात देखील विघ्न निर्माण होत आहेत. उज्जैनमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. उज्जैनजवळील डांगवाडा गावातील दोन भावांची वरात तेथील अस्लाना गावात पोहोचली होती. या ठिकाणी तीन सख्या बहिणींचे एकाच लग्न मंडपात लग्न होते. यातील दोघींचे दोन सख्या भावांसोबत लग्न होते.
लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर सात फेरे सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. दोन सख्या भावांचे लग्न असल्यामुळे वधूचा पोशाख एक सारखाच होता. परंतु, पोशाखात साम्य असल्यामुळे दोन्ही भावांच्या वधूंची अदला बदल झाली. मोठ्या भावाशी लग्न करणार असलेल्या वधूने धाकट्या भावासोबत सात फेऱ्या घेतल्या. तर लहान भावाने मोठ्या भावासोबत लग्न करणार असलेलेया वधूसोबत सात फेरे घेतले. काही वेळानंतर लग्नमंडपात पुन्हा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तेथे उपस्थित सर्वच जण गोंधळून गेले. परंतु, भटजींनी ही चूक सुधारण्यासाठी दोन्ही भावांना पुन्हा एकदा आपापल्या वधूंसोबत सात फेरे घ्यायला लावले.
दरम्यान, डांगवाडा गावात घडलेल्या या प्रकाराला तेथील स्थानिक ग्रामस्थांनीही देखील दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात विजेचे संकट सतत गडद होत चालले आहे. त्यामुळे लग्नसमारंभात अनेक अडचणी येत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकारामुळे मध्य प्रदेशमध्ये विजेचे संकट किती भयंकर आहे याचीच प्रचिती येत आहे.
महत्वाच्या बातम्या