भोपाळ: मध्यप्रदेश सरकारने वाढत्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी रविवारी नविन नियम जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. यासोबत सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील नियमावलीत केले आहे. तसेच क्रायसिस मॅनेजमेंट टीम रात्रीच्या संचारबंदी संदर्भात निर्णय घेईल. 


महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मागच्या चोवीस तासांत 16 हजार 620 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. हा रूग्णांचा आकडा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बाजूचेच राज्य असल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन नियमावली जाहीर केली. 


कोरोना रूग्णांची सद्यस्थिती


गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या (25,320) नवीन रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये  87.73% रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात 15,602 इतक्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यापाठोपाठ केरळमध्ये 2,035 तर पंजाबमध्ये 1,510 नवीन रुग्णांची नोंद झाली. भारतात आज एकूण सक्रिय रुग्णसंख्या  2.10 लाख  (2,10,544) आहे


मध्यप्रदेशातील कोरोनाची सद्यस्थिती


मध्यप्रदेशातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात रविवारी 743 नव्या रूग्नांची नोंद झाली आहे. नव्या रूग्णांसोबतच आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रूग्नांची संख्या 2 लाख 68 हजार 594 पर्यंत पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 3887 झाली आहे. 


मध्यप्रदेशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की,रविवारी राज्यातील कोविड-19 चे 296 नविन रूग्न इंदौरमध्ये सापडले. तर भोपाळमध्ये 139 आणि जबलपूरमध्ये 45 नविन रूग्नांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील 2 लाख 68 हजार 594 कोरोनाबाधित रूग्णांपैकी आतापर्यंत 2 लाख 59 हजार 987 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 4740 रूग्नांवर रूग्नालयात उपचार सुरू आहेत. तसेच रविवारी 513 रूग्न बरे होऊन रूग्नालयातून घरी गेले आहेत.