नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लॉटस सुरू झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबीनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांचे राजीनामे कमलनाथ यांनी घेतले आहे. नाराज आमदारांना शांत करण्यासाठी आणि मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधील ऑपरेशन लोटस यशस्वी होणार की फेल जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसच्या हातातून मध्यप्रदेशची सत्ता खेचण्यासाठी भाजपनं कमलनाथ सरकारचे मंत्री आणि आमदार फोडायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मध्यप्रदेशातल्या कमलनाथ यांच्या सरकारमधील्या 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी काँग्रेसला दणका देत बंगळुरु गाठलं आहे. या आमदारांना विशेष विमानानं बंगळुरुमध्ये आणण्यात आल्याची माहिती आहे. भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. विशेष म्हणजे 15 मार्चपासून मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.
काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या हरदीप सिंग डंग या आमदाराने विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देखील सोपवला आहे. बीसाऊ लालसिंग हे देखील काल बंगळूरहून भोपाळला आले आहे. परंतु भाजप सूत्रांचे म्हणणे आहे की, बिसाऊ लालसिंगही त्यांच्यासोबत आहेत आणि गरज भासल्यास ते भाजपबरोबर उभे राहतील या आश्वासनानंतर ते भोपाळला रवाना झाले आहेत.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी आज बंडाचा पवित्रा घेत कर्नाटक गाठले आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील घडामोडींवर भाजपा बारीक लक्ष ठेवून आहे. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना तातडीने भोपाळमध्ये बोलावले आहे. दरम्यान, कर्नाटक गाठलेल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्रावर सोपवण्यात आली आहे.