LTTE Supremo V Prabhakaran : श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटनेचा नेता आणि एलटीटीई (LTTE) म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केलाय. लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या हत्येनंतर अचानक लिट्टेकडून प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता. 


LTTE leader V Prabhakaran Alive : एलटीटीईचा नेते (LTTE Leader) प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा


श्रीलंकन लष्कराने तमिळ बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी जाफना आणि उत्तर श्रीलंकेत केलेल्या लढाईत लिट्टे सह त्याचा प्रमुख व्ही प्रभाकरन ही मारला गेल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या कुटुंबासह राहत आहे, असा दावा आता माजी काँग्रेस नेते पळा नेदुमारन यांनी केला आहे. नेदुमारन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. 


Prabhakaran Alive : प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा






प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे नेदुमारन यांनी सांगितलं. “मी प्रभाकरनच्या इच्छेनुसार तो जिवंत असल्याचं उघड करत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. तामिळनाडूमधील तंजावरजवळील विलार येथील मुल्लिवाइक्कल मेमोरिअलमध्ये सोमवारी तमिळांच्या जागतिक महासंघाचे प्रमुख पी नेदुमारन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ''प्रभाकरन लवकरच तमिळ नागरिकांसाठी आनंदाची बातमी देतील. जगातील सर्व तामिळ नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे'' एलटीटीई प्रमुख लवकरच लोकांसमोर येणार असल्याचा दावा नेदुमारन यांनी केला.






याआधी प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 मे 2009 रोजी प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा केला गेला होता. रिपोर्टनुसार, श्रीलंकन ​​सैन्याने प्रभाकरनला चारही बाजूंनी घेरले. श्रीलंकन ​​सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्रभाकरन ठार झाला. श्रीलंकन सैन्याने ठार केल्यानंतर प्रभाकरनचे फोटो प्रसिद्ध केले होते.


नेदुमारन यांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ


त्यानंतर आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा जागतिक तमिळ महासंघाचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. नेदुमारन यांनी वक्तव्य केलं आहे की, ''आमचे तामिळ राष्ट्रीय नेते प्रभाकरन यांच्याबद्दल सत्य सांगताना आनंद होत आहे. ते जिवंत आणि स्वस्थ आहेत. जगभरातील तमिळ लोकांसाठी ही घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.''


प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्यावर श्रीलंकेने काय म्हटले?


'लिट्टे' प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तर, श्रीलंकेच्या लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे. श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळला. त्यांनी म्हटले की, प्रभाकरन ठार झाल्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामध्ये डीएनए अहवालाचा समावेश आहे. त्याआधारे प्रभाकरन ठार झाल्याचे सिद्ध होत असल्याचे त्यांनी 'एबीपी नाडू'सोबत बोलताना सांगितले. 


तर, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली सबरी यांनी प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्याबाबतची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी 'एबीपी नाडू'सोबत बोलताना सांगितले.