नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या तोंडावर स्वयंपाकाचा गॅस महागल्याने सामान्य माणसांचे बजट विस्कळीत होणार आहे. अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.94 रुपयांची, तर विनाअनुदानित गॅसच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. जून महिन्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल सहा वेळा एलपीजी गॅस दरात वाढ केली आहे.

अनुदान काढून टाकण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दरमहा चार रुपयांनी वाढविण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जुलैमध्ये केली होती. त्या धोरणाला अनुसरून ही वाढ करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या दरांचा आढावा घेतात. विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत यापूर्वीही वाढविण्यात आली आहे.

आता विनाअनुदानित गॅस दरामध्ये 60 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने एलपीजीची किंमत 880 रुपयापर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील घसरण आदी घटकांमुळे स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ करण्यात आली आहे. अनुदानित गॅस सिलिंडरवर सरकारच्या वतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येते. गेल्या महिन्यात प्रतिसिलिंडर 276.60 रुपये अनुदान जमा करण्यात येते होते. या महिन्यात हे अनुदान 433.66 रुपये करण्यात आले आहे.