LPG Cylinder Expiry Date : तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरचा वापर करत असाल, तर अनेकदा त्याच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न मनात घर करत असतीलचं. दरम्यान, ऑइल मार्केटिंग कंपनी आयओसीएल (Indian Oil) नं ग्राहकांचे हे प्रश्न लक्षात घेत त्यावर अत्यंत महत्त्वाची माहिती जारी केली आहे. इंडियन ऑईलनं जारी केलेली माहिती तुमच्या आमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्यास मदत करतील. 


आयओसीएलनं दिली माहिती 


आयओसीएलनं आपल्या वेबसाइटवर माहिती दिली की, सर्व एलपीजी सिलेंडर एक खास स्टील आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंगसह तयार होतं. याची मॅन्युफॅक्चरिंग BIS 3196 अंतर्गत होते. ज्या मॅन्यूफॅक्चर्सना चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्स (CCOE) ची मान्यता असते, केवळ त्याच मॅन्यूफॅक्चर्सना सिलेंडर तयार करण्याची परवानगी असते. 


एक्सपायरी डेट कशी तपासाल?


सिलेंडरच्या एक्सपायरी डेटसंदर्भातील परिपत्रक 2007 चे असले तरी आयओसीच्या वेबसाईटवर हे देखील सांगण्यात आलं आहे की, ज्या वस्तू विशिष्ट वेळेत नाश पावणार आहेत, त्यांचीच एक्सपायरी डेट असते. एलपीजी सिलेंडरबाबात बोलायचं झालं तर, सिलेंडर तयार करताना अनेक बाह्य आणि अंतर्गत पॅरामीटर्सद्वारे निर्धारित केलेले आहेत. त्या पॅरामिटर्सनुसारच, सिलेंडर तयार केले जातात. त्यामुळे त्यांची एक्सपायरी डेट नसते. परंतु, प्रत्येक सिलेंडरची एका विशिष्ठ कालावधीनंतर टेस्टिंग केली जाते. 


सिलिंडरच्या मार्किंग किंवा कोडबाबत जाणून घ्या 


एलपीजी सिलेंडरची वैधानिक चाचणी आणि पेंटिंगसाठी वेळ निश्चित केली जाते. तसेच त्याच्यावर चाचणी करण्याची पुढील तारीख कोणती असेल, ते एका कोडप्रमाणे लिहिलं जातं. त्या कोडनुसार, पुढच्या तारखेच्या वेळी त्यांना चाचणीसाठी पाठवलं जातं.  उदाहरणार्थ, A 2022 म्हणजे, 2022 वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये हे सिलेंडर चाचणीसाठी पाठवले जाणार. अशाच प्रकारे B 2022 ज्या सिलेंडरवर लिहिलं असेल त्यांना वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये चाचणीसाठी पाठवलं जातं. तर C 2022 चा अर्थ आहे की, वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हे सिलेंडर चाचणीसाठी पाठवले जातील. ज्या सिलेंडरवर D 2022 लिहिलेलं असेल ते सिलेंडर चाचणीसाठी चौथ्या तिमाहीत पाठवले जातील. 


जर तुम्हाला यासंदर्भात आणखी माहिती हवी असेल, तर इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तसेच सविस्तर माहिती वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला आयओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. गॅस सिलेंडरबाबत सविस्तर वाचण्यासाठी https://iocl.com/pages/indane-cooking-gas-overview या लिंकवर क्लिक करा.