'ईपीएफओ'च्या 'या' कर्मचाऱ्यांना 50 हजारांचा लॉयल्टी बोनस
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2017 08:35 AM (IST)
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या दीर्घकालीन सभासदांसाठी खुशखबर आहे. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जुन्या खातेधारकांना घसघशीत लाभ होणार आहे. 20 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीपासून पीएफ खातं असणाऱ्या सभासदांना 50 हजार रुपयांचा लाभ होणार आहे. बांधिलकी रक्कम (लॉयल्टी बोनस) म्हणून खातेदाराला 50 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला आहे. निवृत्तीच्या वेळी ही रक्कम खातेधारकांना मिळणार आहे. मूळ वेतन पाच हजार रुपयांपर्यंत असलेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार रुपये, तर पाच हजार ते दहा हजार रुपयांदरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांचा लाभ होईल. विशेष म्हणजे ईपीएफओ अंतर्गत विमा उतरवलेल्या खातेदारांचा खाते कालावधीतच मृत्यू झाल्यास अडीच लाखांची भरपाईही मिळणार आहे.