नवी दिल्ली : अयोद्धेतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी नसर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालाविरोधात दाखल झालेल्या 19 फेरविचार याचिका गुरुवारी (12  डिसेंबर) फेटाळण्यात आल्या. फेरविचार याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर याचिका फेटाळण्यात आल्या.


मुख्य न्यायमूर्ती एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, अशोक भूषण, ए अब्दुल नझीर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका मेरीट नसल्यामुळे फेटाळून लावल्या. अयोध्या खटल्यात नऊ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालावर पूनर्विचार करण्यात यावा यासाठी 19 फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावेळी 9 नोव्हेंबर रोजी दिलेला निकाल अंतिम असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे.


सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
राजकीयदृष्ट्या संवेदनशील अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने म्हणजेच 5-0 असा ऐतिहासिक निकाल सुनावला होता. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामललाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टात 6 ऑगस्टपासून सलग 40 दिवस अयोध्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. 16 ऑक्टोबर 2019 रोजी अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. तर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला होता.

राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना, मशिदीसाठी 5 एकर जागा
राम मंदिराच्या निर्माण आणि व्यवस्थापनेसाठी तीन महिन्यात ट्रस्टची स्थापन करा आणि त्यात निर्मोही आखाड्याला प्रतिनिधित्त्व देण्याचे आदेशही दिले आहेत. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीच्या निर्माणासाठी 5 एकर पर्यायी जमीन दिली जावी, असा आदेशही कोर्टाने दिला.

असं असेल नवं राम मंदिर
मंदिर एकूण दोन मजल्यांचं असेल. मंदिरातील पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार असेल. मंदिराच्या घुमटावर धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे. एकूण 212 खांबावर मंदिराची उभारणी केली जाणार आहे. नव्या राम मंदिराची लांबी 275 फुट, उंची 135 फुट, रुंदी 125 फुट इतकी असेल. एकूण 36 हजार 450 चौरस फुट इतक्या क्षेत्रफळावर मंदिर उभारलं जाणार आहे.