नवी दिल्ली: येत्या काही दिवसात देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनशी सुरु असलेल्या विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. भारतातही ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर 23 डिसेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.


लंडनहून रात्री भारतात आलेल्या विमान प्रवाशांपैकी दिल्लीतील पाच, कोलकात्यातील दोन, तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय. मुंबईत उतरलेल्या प्रवाशांचे RTPCR अहवाल प्रतिक्षेत असल्याचं सांगण्यात येतंय.


या दरम्यान 21 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजता लंडनहून दिल्लीत पोहोचलेल्या एअर इंडियाच्या विमानातील 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या या विमानातून एकूण 266 प्रवासी भारतात आले आहेत. या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या प्रवाशांना दिल्ली सरकारच्या सरदार वल्लभ भाई पटेल कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रवाशांचे सॅम्पल गोळा करुन ते NCDC मध्ये पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहे.


याचसोबत सकाळी 6.30 वाजता लंडनमधून आलेल्या आणखी एका विमानातून 213 प्रवाशी भारतात आले. या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. RT-PCR चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना 7 ते 14 दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनहून दिल्लीला आलेल्या सर्व प्रवाशाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारन घेतला आहे. असे एकूण 6 ते 7 हजार प्रवाशी असण्याची शक्यता आहे असे दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


मुंबई विमानतळावर खबरदारीचा उपाय
सोमवारी रात्री उशीरा ब्रिटनमधून मुंबईत दोन विमाने आली होती. त्यातील सर्व प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला असून त्यासाठी 50 बेस्टच्या बसेसची सोय करण्यात आली होती. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यात नव्या स्ट्रेन आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांचे सॅम्पल्स पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटंरला पाठवण्यात आले आहेत. मुंबईत आलेल्या या प्रवाशांचे कोरोना अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. बीएमसीने या सर्व प्रवाशांना 7 ते 14 दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी RT-PCR चाचणी करण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्या: