Lokniti- CSDS Exit Poll :  पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना लोकनीती-सीएसडीएसने आपला एक्झिट पोल जाहीर केला  आहे. लोकनीती-सीएसडीएसने आपल्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची आकडेवारी न देता मतांच्या टक्केवारांचा अंदाज वर्तवला आहे. 


लोकनीती-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का बसणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष दमदार कामगिरी करणार आहे. आम आदमी पक्षाला 40 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेसच्या मतात घट होणार असून 26 टक्के मते मिळणार आहेत. शिरोमणी अकाली दलाला 20 टक्के, भाजप आघाडीला 7 टक्के मते मिळणार असल्याचे लोकनीति-सीएसडीएसने म्हटले आहे. 







उत्तराखंडमध्ये भाजपकडे सत्ता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 38 टक्के, आम आदमी पक्षाला 3 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 






गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभा निर्माण होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच असणार आहे. भाजपला 32 टक्के, काँग्रेसला 29 टक्के आणि तृणमूल काँग्रेसला 14 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाला 7 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 







संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 43 टक्के मते मिळतील. समाजवादी पक्षाला 35 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. बहुजन समाज पक्षाला 15 टक्के आणि काँग्रेसला 3 टक्के मते मिळण्याची शक्यता असल्याचे लोकनीति-सीएसडीएसने एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. 







याआधी सी-व्होटर व इतर संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटणार असल्या तरी त्यांना सत्ता स्थापन करता येईल.