नवी दिल्ली : संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे (parliament security breach) आदेश केंद्रीय गृह खात्यानं (MHA ) दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग (Anish Dayal Singh) यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाईल. अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील. ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल, तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करेल. 


केंद्रीय गृह खात्यानं अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.






 प्राथमिक चौकशीनुसार संसदेत गोंधळ करणारे सर्व जण इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात होते, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे संसदेबाहेर अटक झालेल्यांना निदर्शनं करण्याआधी स्वतःचा मोबाईल तोडून टाकला अशी माहिती पोलिसांनी दिलीय. चौकशीत हे चौघेही पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी सकाळी शहिदांना आदरांजली वाहिली. आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच, संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केली. उत्तर प्रदेशातील सागर शर्मा आणि कर्नाटकच्या मनोरंजन याने सभागृहात उड्या मारल्या. आणि स्मोक कॅण्डल जाळले. त्यामुळे सभागृहात धुराचे लोट पसरले. हे सगळं घडत असताना संसदेबाहेर, हरियाणाची नीलम सिंग आणि महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे निदर्शन करत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय.


पोलिसांनी सहा जणांना केली अटक - 


संसद भवनात गोंधळ माजवण्याच्या उद्देशानं 4 नव्हे तर 5 जण आले होते, असा दिल्ली पोलिसांना संशय आहे. ललित झा असं या व्यक्तीचं नाव आहे. तो सध्या फरार आहे. अमोल शिंदे आणि नीलम सिंह जेव्हा संसदेबाहेर स्मोक कँडल फवारत होते, तेव्हा ललित त्यांचा व्हिडीओ काढत होता. अमोल आणि नीलमला पकडल्यावर ललित तिथून पळून गेला, असा पोलिसांना संशय आहे. या चौघांचे फोन ललितकडे आहेत. दिल्ली पोलीस त्याचा कसून शोध घेतायेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाच जणांचा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, ही सहावी व्यक्ती या पाच जणांना रसद पुरवत होती, असाही पोलिसांना संशय आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणात उशीराने आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी गुडगावमधून ताब्यात घेतलंय. गुडगावमधील शर्मा दाम्पत्याच्या घरी चौघे आरोपी थांबले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, सुरक्षा भेदल्याने कारवाई