अहमदाबाद : सुरतमधील स्वामी नारायण मंदिरामधील पुजाऱ्यांनी भगवान स्वामी नारायण यांना रा. स्व. संघाच्या गणवेशातील वस्त्रे परिधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

भगवान स्वामी नारायण यांना रा. स्व. संघाच्या गणवेशातील वस्त्रे परिधान केल्याने काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे भाजपने धार्मिक संस्थांनी अशा विषयांवर चार हात लांबच राहण्याचा सल्ला मंदिर प्रशासनाला दिला आहे.

 

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भगवान स्वामी नारायण यांना रा. स्व. संघाच्या गणवेशातील पांढरा शर्ट, खाकी रंगाची पॅन्ट, काळी टोपी आणि पायात काळे बुट घातल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत स्वामी नारायण यांच्या हातात राष्ट्रध्वजही देण्यात आला आहे. यामुळे गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

ही वस्त्रे काही दिवसांपूर्वी स्थानिक भक्ताच्या आग्रहावरून परिधान करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाचे विश्वप्रकाश यांनी सांगितले.