विशेष म्हणजे तीन दिवसांत तुम्ही बँकेला अशा चुकीच्या व्यवहारांविषयी माहिती दिली, तर दहा दिवसांत संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात क्रेडीट होईल. तर थर्ड पार्टी फ्रॉडविषयी चार ते सात दिवसात ही सूचना बँकेला दिल्यास ग्राहकांना 25 हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
वेळेत ही सूचना बँकेला दिली नाही, तर खातेदारालाच संपूर्ण नुकसान सहन करावं लागणार आहे. ग्राहकाच्या हलगर्जीने (पेमेंट विषयीचे डिटेल्स शेअर केल्याने) हे गैरव्यवहार झाले असतील, तर मात्र फटका तुम्हालाच सहन करावा लागेल.
आरबीआयनं काढलेल्या नव्या नियमानुसार बँकांना ग्राहकांचे मोबाईल नंबर त्यांच्या अकाऊंट नंबरशी संलग्न करावे लागणार आहेत. बँकांनी केलेल्या मेसेजेसना रिप्लाय करण्याचा पर्याय द्यावा अशीही शिफारस करण्यात आली आहे.
यापुढे तुमच्या अकाऊंटवरुन चुकीचे व्यवहार कोणामार्फत करण्यात आले आणि त्याची माहिती वेळेवर तुम्ही बँकेला दिलीत, तर ते नुकसान बँक स्वतः सहन करणार आहे. बँकांना इन्शुरन्स सेटलमेंटची वाट न पाहता ही रक्कम 10 दिवसांत ग्राहकाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.
...तर ग्राहकांना पूर्ण भरपाई
1. बँकेकडून कॉन्ट्रिब्युटरी फ्रॉड, हलगर्जी किंवा चूक झाली आणि ग्राहकांनी बँकेला सूचना दिली नसली तरी ग्राहकांना फटका बसणार नाही. पूर्ण भरपाई मिळेल.
2. अनऑथराईज्ड बँक व्यवहार बँक किंवा ग्राहकांच्या चुकीमुळे झाला नाही, तिसऱ्याच पक्षाकडून झाला असेल, तर त्याबाबतचा मेसेज आल्यानंतर, तुम्हाला तीन दिवसात कळवावं लागेल. त्यावेळी तुम्हाला पूर्ण भरपाई मिळेल.
...तर 5 ते 25 हजारापर्यंत भरपाई
- जर तुमच्या चुकीमुळे म्हणजे पासवर्ड शेअर करणं, एटीएम कार्ड/पिन वापरायला दिल्यामुळे फ्रॉड झाला, आणि त्याबाबत तुम्हाला समजल्यावर तातडीने बँकेला कळवल्यास, तुम्ही माहिती दिल्यानंतरचं नुकसान बँक सहन करेल. बँकेला कळवण्यापूर्वी जे काही नुकसान झालं असेल, ते तुमचं असेल.
2. ज्या व्यवहारात ना तुमची ना बँकेची चूक असते, तांत्रिक बिघाडामुळे काही नुकसान झालं असेल, आणि ते कळवण्यास विलंब झाला असेल तर म्हणजेच 4 ते 7 दिवसांपर्यंत कळवल्यास, तुम्हाला मर्यादित भरपाई मिळेल. ही भरपाई कमीत कमी 5 हजार ते जास्तीत जास्त 25 हजारापर्यंत असेल. जो आकडा कमी तो ग्राह्य धरला जाईल. म्हणजे जर तुमचं 4 हजारांचं नुकसान झालं तर चार हजारच परत मिळतील, पण जर तुमचं 6 हजाराचं नुकसान झालं तर मात्र तुम्हाला 5 हजारच परत मिळतील.