Karnataka Flood : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक (Karnataka) राज्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. या अतिवृष्टीमुळं 27 जिल्हे आणि 187 गावं बाधित झाली आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळं लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 




अतिवृष्टीमुळं 7 हजार 647.13 कोटी रुपयांचे नुकसान


संततधार पावसामुळ कर्नाटक राज्यात अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामनगरासह बाधित भागाला भेट दिली. त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच लोकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच जूनपासून राज्यात अतिवृष्टीमुळं 7 हजार 647.13 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकचे महसूल मंत्री आर अशोक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  दरम्यान, ही पूर परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.




आत्तापर्यंत पावसामुळं 5.8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान


पावसाच्या घटनांमुळे राज्यात एकूण 23 हजार 794 घरांचे नुकसान झाले आहे. तर शेती  पिकांचे देखील पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसामुळं 5.8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्याची माहिती मंत्री अशोक यांनी दिली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मंत्री अशोक म्हणाले. 


दरम्यान, सर्वात भीषण परिस्थिती ही कर्नाटक राज्यातील रामनगरात आहे. तिथे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अेनक ठिकाणी रस्त्यावर उभी केलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. कर्नाटकबरोबरच केरळ आणि आंध्र प्रदेशात देखील पाऊस आणि पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या :