त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांचा राडा, लेनिनचा पुतळा बुलडोझरने तोडला!
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 11:08 PM (IST)
भाजपच्या विजयानंतर त्रिपुरातील विविध भागात सातत्याने हिंसेच्या घटना घडत असल्याचे स्वत: पोलीस अधीक्षकांनीच सांगितले आहे.
आगरतळा : दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा होता. हा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडला. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी एकच गोंधळ घातला. त्रिपुरात भाजपचं सरकार बनल्यानंतर राज्यभरात जवळपास सर्वच भागात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. भाजप आणि आयपीएफटीचे कार्यकर्ते हिंसा करत असल्याचा आरोप सीपीएमने केला आहे. बुलडोझर चालकाला दारु पाजली! त्रिपुराचे पोलीस अधीक्षक कमल चक्रवर्ती यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या मदतीने लेनिनचा पुतळा तोडला. बुलडोझर चालकाला दारु पाजण्यात आली होती. पोलिसांनी बुलडोझर चालकाला पोलिसांनी अटक केली असून, बुलडोझर सील करण्यात आले आहे. भाजपच्या विजयानंतर त्रिपुरातील विविध भागात सातत्याने हिंसेच्या घटना घडत असल्याचे स्वत: पोलीस अधीक्षकांनीच सांगितले आहे. मात्र, या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असून, घटनांची संख्या मोठी असल्याने नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. दरम्यान, त्रिपुरात निवडणूक जिंकल्यानंतर हिंसेच्या घटना घडणे म्हणजे पंतप्रधां मोदींच्या लोकशाहीवरील विश्वासाच्या दाव्याचा चेष्टा आहे, असे सीपीएमने म्हटले आहे.