अहमदाबाद : गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली. भूपेंद्र पटेल संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटायला जातील. दुसरीकडे, भूपेंद्र पटेल यांच्यासह 15 मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात.
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. दोन्ही नेते गांधीनगरमधील भाजपा कार्यालय श्री कमलम येथे पोहोचले होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर सहमती झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली होती.
विधानसभा निवडणुकांना एक वर्ष राहिलं असताना राजीनामा..
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.