मुंबई : टोलमुक्तीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून राज्यभरासह देशभरातील राष्ट्रीय महमार्गांवर पुन्हा टोल भरावा लागणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पाच वेळा टोलमाफी जाहीर केली. 500 आणि 1000 नोटा बंद झाल्यामुळे टोल नाक्यांवर गर्दी वाढत होती. तसंच वादविवाद आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवल्याने सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र आता चलन तुटवडा काही प्रमाणात भरुन निघाल्याने आज मध्यरात्रीपासून टोल पुन्हा सुरु होणार आहे. पण टोल भरण्यासाठी नव्या नोटाच द्याव्या लागणार आहेत.
8 नोव्हेंबरनंतरच्या नोटबंदीनंतर 14, 18, 24 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरपर्यंत वेळोवेळी टोलमाफी देण्यात आली होती.
टोलमाफीच्या घोषणा पहिली घोषणा
– 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत दुसरी घोषणा – 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत तिसरी घोषणा
– 14 ते 18 नोव्हेंबर चौथी घोषणा – 18 ते 24 नोव्हेंबर पाचवी घोषणा – 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016
टोल नाक्यांवर 5 ते 100 रुपयांपर्यंतची कुपन्स 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल नाके सुरु होत आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी टोलची कुपन देण्याचा विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे सुरु आहे. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील. त्यामुळे टोलचे पैसे देतानाही ही कुपन्स वापरता येतील, तसंच उरलेले सुट्टे पैसे म्हणूनही टोलधारक ही कुपन्स ग्राहकांना परत करतील.
टोलवसुलीची कालमर्यादा वाढवण्याचा सरकारचा विचार दरम्यान, टोलमुक्तीमुळे कंत्राटदारांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, पैसे देण्याऐवजी टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील 65 टोल नाक्यांवर वसुली बंद होती. राज्यात दिवसाला साडे सहा कोटी रुपयांची टोलवसुली होते. परंतु तीन आठवडे टोलवसुली बंद असल्याने कंत्राटदारांना 125 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली केली. पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करणार आहे. मात्र ही वसुली सर्वसामान्यांच्या खिशातूनच होण्याची शक्यता आहे. राज्यातील 65 टोल नाक्यांपैकी 53 टोलनाक्यावर लहान वाहनं वगळता जड आणि मोठ्या वाहनांकडून वसुली केली जाते. पण मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह 12 टोलनाक्यांवर सर्वच वाहनांकडून टोल घेतला जातो.