नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा अर्थात सोळाव्या लोकसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संसदेत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी सोळाव्या लोकसभेतील आपले शेवटचं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर कोपरखळ्यांचा पाऊस पाडला. दरम्यान, सोळाव्या लोकसभेच्या निरोपाचा दिवशीही लालकृष्ण अडवाणींना बोलायची संधी मिळाली नाही.

गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला नेमका फरक पहिल्यांदा कळला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गळाभेटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लगावला.  सभागृहात पहिल्यांदाच आपण अनेक गोष्टी अनुभवल्या सांगत गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला फरक पहिल्यांदाच कळला असा टोमणा राहुल गांधींचं नाव न घेता मारला. पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप आला नाही असंही पुढे ते म्हणाले.

आम्ही ऐकत होतो की भूकंप येणार, पण कोणताही भूकंप आला नाही. कधी विमानं उडवण्यात आली. पण आपल्या लोकशाहीची उंची इतकी मोठी आहे की कोणतंही विमान त्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही, असंही  मोदी यावेळी म्हणाले.


राहुल गांधींनी घेतलेल्या गळाभेटीवर बोलताना ते म्हणाले की, मी पहिल्यांदा येथे आलो तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पहिल्यांदा मला गळाभेट आणि गळ्यात पडणं यामधील फरक कळला. पहिल्यांदाच पाहिलं की सभागृहात अनेकांची आँखो की गुस्ताखिया सुरु आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खर्गे यांचं कौतुकही केलं. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी पेलली असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने सोळाव्या लोकसभेतील अखेरच्या अधिवेशनाची सांगता झाली.