श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी भवनच्या गेट नंबर तीनजवळ दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्राच थांबवण्यात आली आहे.

ही दरड एका ट्रकवर कोसळली आहे. या दरडीखाली अनेकजण दबले गेल्याची भीतीही वर्तवली जात आहे.

दरड कोसळल्यानंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेच्या कारणामुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे.

वैष्णोदेवी मंदीर प्रशासनाने दरडीखाली दबलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे. तसंच जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान दरड खूप मोठी असल्याने दरड कापून दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरडीखाली किती नागरिक दबले आहेत याची माहिती अद्याप उघड झाली नाही.

 

यापूर्वीची दुर्घटना

यापूर्वी 6 ऑगस्टलाही वैष्णोदेवी मंदीराच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळून चार भाविकांचा मृत्यू झाला होता. बाणगंगा-अर्धकुमारी मार्गाजवळ मध्यरात्री दरड कोसळली होती. भाविक बसलेल्या जागीच ही दरड कोसळली होती.

 

भाविकांसाठी नवीन रस्ता

वैष्णोदेवीच्या भाविकांसाठी कटरापासून अर्धकुवारीपर्यंत नवीन रस्ता बनवला जात आहे, हा रस्ता लवकरच खुला केला जाणार आहे. या मार्गावर आधुनिक सोयीसुविधा असतील, तसंच नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या आदेशांमुळे फक्त पादचारीच या मार्गाचा वापर करु शकतील.

नवीन ट्रॅक बालिनी पुलाजवळ बनवला जात असून त्याची लांबी 7 किमी आहे. नवीन ट्रॅकवर आपत्कालीन स्थितीत अँब्युलन्स जाण्याचीही सोय असेल.