पाटणा : नितीश कुमार पलटूराम आणि सत्तेचे भुकेले आहेत, अशी जळजळीत टीका राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्यानंतर, काल लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमारांवर जोरदार हल्ला चढवला.

लालू यांनी आपल्या आक्रमक शैलीत नितीश आणि भाजपवर तोफ डागली. ''तेजस्वी हे केवळ निमित्त होते. तेजस्वीनं उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता, तरी नितीश भाजपसोबतच गेले असते,'' असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

लालू प्रसाद यादव म्हणाले की, ''नितीश कुमार आज नरेंद्र मोदींचा उदोउदो करत आहेत. पण यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदींबद्दल जी भूमिका घेतली. त्यांच्याविषयी जी टिप्पणी केली, ती संपूर्ण देशाला माहिती आहे. कालपर्यंत नितीश कुमार नरेंद्र मोदींना दुषणं देत होते. पण आता भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जय श्रीरामचा नारा देत आहेत.''

ते पुढे म्हणाले की, ''सुरुवातीपासूनच नितीश कुमार आणि मोदी एकत्रित होते. तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला असता, तरीही महागठबंधन तुटलंच असतं. काल अमित शाह म्हणाले की, आम्ही कुणाला तोडलं नाही. पण नितीश कुमारांना तोडलं नाही का? मुख्यमंत्र्याच्या परवानगीशिवाय घटात्मक पदावरील व्यक्तीच्या घरावर सीबीआयची छापेमारी कशी काय होते?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नितीश कुमार सुरुवातीपासूनच आमचा द्वेष करत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, काल नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादवांवर टीका केली होती. त्यानंतर लालूंनी हे प्रत्युत्तर दिलंय. बिहारच्य राजकारणात नितीशकुमारांनी भाजपची साथ दिल्यामुळे इथं वाद सुरु झालाय.