Lalu Prasad Health Update : चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर प्रकृती अस्वास्थामुळे उपचार सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी त्यांना रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमधून दिल्लीच्या एम्समध्ये रेफर केलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी एअर अॅम्बुलन्सने दिल्लीमध्ये आणलं गेलं. आता त्यांच्यावर पुढील उपचार दिल्लीतील एम्स रुग्णालयात करण्यात येणार आहेत. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमधून दिल्लीच्या एम्समध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.


राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) चे डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितलं की, "लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांची तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना न्युमोनिया झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांचं वय लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एम्समधील विशेतज्ज्ञांसोबत आमचं बोलणं झालं आहे."





यापूर्वी लालू प्रसाद यांचा मुलगा, तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्वीट करत सांगितलं होतं की, "अशी माहिती मिळाली आहे की, लालू प्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, तसेच त्यांची किडनीही फक्त 25 टक्केच काम करत आहे. आम्ही आई आणि भावासोबत रांचीला रवाना झालो आहोत, आम्ही त्यांची भेट घेण्याची विशेष परवानगी मागितली आहे."


लालूंचे मूळ गाव फुलवारीयात प्रार्थना


दुसरीकडे लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि आरजेडी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी गोपाळगंजमधील फुलवारीयामध्ये पूजा-पाठ केलं. फुलवारीयाच्या पंच मंदिरामध्ये, वैदिक जप करून पुरोहित दयाशंकर पांडे आणि हिरामण दास यांनी लालू यांची प्रकृती सुधारण्यासाठी खास पूजा अर्चना केली. यासह समर्थकांनी हवनही केले.


लालूंचा पुतण्या नितीशकुमार यादव, नातू लवकुश यादव, अभिषेक कुमार अभय, परमहंस यादव, विनीत यादव, राहुल कुमार, नितेश पांडे यांच्यासह आरजेडीचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लालू यांचे पुतणे नितीश यादव म्हणाले की, आम्हाला आई दुर्गावर पूर्ण विश्वास आहे की आईच्या आशीर्वादाने ते लवकरच बरे होतील.