नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सोमवारी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावूक झालेले पाहायला मिळाले. अटलजींसोबत असलेली माझी 65 वर्षांची मैत्री हे माझं सौभाग्य असल्याचं यावेळी अडवाणी म्हणाले.


अडवाणी यांनी आपल्या भाषणात अटलजींसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महत्वाची बाब म्हणजे गेल्या 4 वर्षात अडवाणी अशाप्रकारे कुठल्याही जाहीर कार्यक्रमात बोलले नव्हते.


"आयुष्यात अनेक सभांना संबोधित केलं, मात्र अटल बिहारी वाजयेयींसाठी आयोजित केलेल्या सभेला संबोधित करावं लागेल, असा कधी विचार केला नव्हता. अटलजींनी आम्हाला खूप काही शिकवलं आणि खूप काही दिलं. अटलजींकडून जे काही मिळालं ते आत्मसात करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे." असं दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत अडवाणी म्हणाले.


"आज अटलजींच्या अनुपस्थितीत मी बोलत आहे, यांचं मला अत्यंत दु:ख होत आहे. मला अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून खुप काही शिकायला मिळालं. अटलजी नेहमी म्हणायचे मी किती दिवस राहणार, ते ऐकूण फार वाईट वाटायचं. मात्र आज अटलजी नाहीत आणि त्यांच्या आठवणीत ही सभा होत आहे", असं सांगताना अडवाणी भावूक झालेले पाहायला मिळाले.


"अटलजींच्या परिचयाचे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आज इथे उपस्थित आहेत, याचा मला आनंद होत आहे", असंही अडवाणी म्हणाले.