India China Row : एलएसीवरून सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान चीन लवकरच अक्साई चीनमध्ये नवीन महामार्ग बांधणार आहे. तिबेट आणि शिनजियांग दरम्यान बांधण्यात येणारा G-695 महामार्ग अक्साई चीनमधून जाणार आहे. यापूर्वी चीनने अक्साई-चीनमध्ये महामार्ग बांधून भारतासोबत सीमा वाद सुरू केला होता. मात्र चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवड्यात चीनने आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत नवीन महामार्ग बांधकाम योजना जारी केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण चीनमध्ये 345 नवीन महामार्ग बांधले जाणार आहेत. या महामार्गांचे लांबी सुमारे 4.61 लाख किलोमीटर आहे. 2035 पर्यंत हे सर्व महामार्ग तयार होतील असे चीनचे म्हणणे आहे. परंतु या महामार्गांपैकी सर्वात वादग्रस्त G-695 महामार्ग आहे, जो तिबेट स्वायत्त प्रदेशातील लुहांजे काउंटीपासून शिनजियांगमधील माझापर्यंत जाणार आहे.
हा महामार्ग भारताला लागून असलेल्या विवादित नियंत्रण रेषेजवळून जाणार आहे. हा महामार्ग चीनच्या पीएलए सैन्याच्या छावण्या आणि लष्करी तळांच्या जवळून जाईल, जेणेकरून सैन्याची हालचाल वेगाने होऊ शकेल.
LAC च्या अगदी जवळ महामार्ग बांधण्याबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना चीनच्या या नव्या महामार्गाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भारत सरकार भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यासाठी आवश्यक पावलेही उचलली जात आहेत. 1957 पूर्वी अक्साई चीन हा भारताचा भाग होता आणि आजही भारत त्याला आपला भाग मानतो.
1957 मध्ये चीनने भारतातील अक्साई चीनमध्ये G-219 राष्ट्रीय महामार्ग बांधला आणि त्यानंतर भारताचा हा भाग पूर्णपणे ताब्यात घेतला. हा G-219 महामार्ग 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धाचे प्रमुख कारण होता. चीनने नंतर शिनजियांग ते तिबेटपर्यंत जाणार्या या महामार्गाची लांबी 10 हजार किलोमीटरपर्यंत वाढवली. या महामार्गाचा सुमारे 180 किमीचा भाग अजूनही अक्साई चीनमधून जातो. आता नवीन एक्सप्रेस हायवेसह चीनने भारताला लागून असलेल्या LAC वर पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.