नवी दिल्ली: केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी चालू आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वर 8.65 टक्के व्याज मिळण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय कामगार भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) च्या सदस्यांमध्ये या विषयावर एकमत असल्याची माहिती त्यांनी पीटीआयला दिली आहे.
चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.65 टक्के व्याज देण्यावर सर्वांचं एकमत आहे. शिवाय अर्थ मंत्रालयामध्येही या विषयावर काम सुरु असून, मंत्रालयाकडूनही सकारत्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
बंडारु दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेखालच्या ईपीएफओसंदर्भातील केंद्रीय विश्वस्त सदस्यांनी(सीबीटी) याचा निर्णय घेतला होता. गेल्या चार वर्षातील हा सर्वात कमी व्याज दर असून, गेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात सर्व कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.8 टक्के व्याज देण्यात आलं. तर 2013-14 या आर्थिक वर्षात जवळपास चार कोटी सदस्यांना 8.75 टक्के, आणि 2012-13 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज देण्यात आलं.
त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.65 टक्के व्याज दिल्यास ईपीएफओकडे 269 कोटी रुपये सरप्लस राहतील. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्र्यांचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला व्याज दरात कपात करण्याच्या सूचनाही केल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या व्याजदर कपातीमुळे पीपीएफ आणि इतर लघु बचत योजनांमध्येही ताळमेळ राखता येणार आहे. अर्थ मंत्रालयानं गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफवर 8.7 टक्के व्याज दर दिलं होतं, तर यावर्षी 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.