लखनऊ : निवडणुकीचा निकाल स्वीकारत असून, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र, ईव्हीएमवरील आरोपांची चौकशी व्हावी, अशी निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.


मायावती यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना अखिलेश यादव यांनी याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली.

दोन युवा नेते एकत्र आले. त्यामुळे यापुढेही काँग्रेससोबत युती कायम राहील, असं अखिलेश यादव यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेससोबत समाजवादी पक्ष पुढे सोबत राहणार की नाही, याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आगामी सरकारने आमच्यापेक्षा चांगलं काम करावं. नवं सरकार 'समाजवादी'पेक्षा चांगलं काम कसं करतं, हे पाहण्यासाठी उत्सुकता आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यास आनंदच होईल, असेही अखिलेश यांनी म्हटलं.

आमची 'सायकल' ट्युबलेस आहे, कधीच पंक्चर होत नाही, असे म्हणत अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा काहीसा प्रयत्नही केला.

उत्तर प्रदेशात भाजपचं कमळ फुललं !

उत्तर प्रदेशात तब्बल 300 पेक्षा अधिक जागा मिळवत भाजपनं होळीआधीच विजयाची रंगपंचमी साजरी केली. यूपीत ऐतिहासिक विजय मिळवताना भाजपनं अखिलेश यादवांची सायकल पंक्चर केली. तर मायावतींचा हत्ती देखील मोदी लाटेपुढे पुरता निष्प्रभ ठरला. यूपीत 9 जागा मिळवणारा अपना दल  6 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष ठरला आहे.

विशेष म्हणजे एकही मुस्लिम उमेदवार न देता भाजपनं मुस्लिमबहुल भागात विजयाचं कमळ फुलवलं आहे. तर दलितबहुल मतदारसंघातही भाजपला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात भाजपनं सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला. दरम्यान, उद्या भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.