प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ 2019 ची सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमस्थळी आधी नागा साधू आणि नंतर इतर आखाड्यांच्या साधू-संतांच्या शाहीस्नानानंतर भाविकांनीही शाहीस्नान केलं.
आज (14 जानेवारी) सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने तीर्थक्षेत्र प्रयागच्या संगमावर कुंभमेळ्याला सुरुवात झाली. आखाड्यांच्या नागा साधू, महामंडलेश्वर, साधू-संतांसह लाखो भाविकांनी संगमात पुण्याची डुबकी मारुन कुंभमेळ्याचा श्रीगणेशा केला.
सकाळी पाच वाजल्यापासून सुरु झालेलं शाहीस्नान आज दिवसभर सुरु आहे. सकाळी सर्वात आधी महानिर्वाणीचे साधू-संत संपूर्ण लवाजम्यासह शाहीस्नानासाठी संगमावर पोहोचले. यानंतर आखाड्यांच्या स्नानाच्या क्रमाची सुरुवात झाली. सर्व आखाड्यांना स्नानासाठी 30 ते 45 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.
साधु संतांसह सामान्य भाविकही संगमाच्या विविध तटावर मध्यरात्रीपासून स्नान करत आहेत. कडेकोट सुरक्षेत तटावर स्नान आणि पूजापाठ सुरुच आहे. पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असूनही मोठ्या प्रमाणात भावित डुबकी मारत आहेत.