नवी दिल्ली : आम आदमी पक्षाची नौका राजकारणाच्या समुद्रात भरकटताना दिसत आहे. आपच्या आंदोलनांशी संलग्न राहिलेला एक-एक शिलेदार आता पक्षाची साथ सोडताना दिसत आहे. आपचे दिग्गज नेते कुमार विश्वासही पक्षाला राम राम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.


विश्वास यांची मनधरणी करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनिष सिसोदियासोबत कुमार विश्वास यांच्या निवासस्थानी गेले होते. विश्वास यांनी गाडीत बसवून नेताना 'चहा पाजायला नेत आहे' असं उत्तर केजरीवालांनी पत्रकारांना दिलं.

आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाला वैतागलेल्या कुमार विश्वास यांनी नुकतंच मनातील रागाला मीडियासमोर वाट मोकळी करुन दिली होती. 'हा माझा नाही, देशाचा आवाज आहे. देशाचा आवाज समोर आणल्याबद्दल कुठलंही सरकार, व्यवस्था किंवा संघटना माझ्यावर नाराज झाली, तरी माफी मागणार नाही. मी बोलत राहणार' अशा भावना विश्वास यांनी व्यक्त केल्या होत्या.

रात्रभर विचार करुन निर्णय जाहीर करणार, असं कुमार विश्वास मंगळवारी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुमार काय घोषणा करणार, याकडे तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

'सहा-सात वर्षांपूर्वी याच घरात मी, अरविंद आणि मनिष यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं स्वप्न पाहिलं होतं. दोन वर्षांपूर्वी लोक जनशक्ती पक्षातून आलेल्या अमानतुल्लाहने मी भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला. पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही. आता अमानतने याचा पुनरुच्चार केला, तेव्हा मला लक्षात आलं, की यामागे दुसऱ्याच कोणाचा तरी हात आहे.' अशा उद्विग्न भावना कुमार
विश्वास यांनी व्यक्त केल्या.

'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ना उपमुख्यमंत्री व्हायचंय, मला पक्षाचं अध्यक्षपदही नको. मला कोणता राजकीय पक्षप्रवेशही करायचा नाही किंवा स्वराज्य आंदोलनात सहभागीही व्हायचं नाही. पण मी माझं मत मांडणार' असा पवित्रा विश्वास यांनी घेतला.

ये बला की साजिशें, ये पैंतरे मेरे खिलाफ... रायगा हैं मैं तुम्हारे खेल का हिस्सा नहीं

असा शेर बोलताना विश्वास भावुक झाले.

काय आहे प्रकरण?

कुमार विश्वास आणि त्यांच्या समर्थकांनी आमदार अमानतुल्ला यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी उचलून धरली आहे. मात्र कुमार विश्वास यांच्यावरच माफी मागण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भ्रष्टाचाराविरोधात निर्माण झालेला पक्ष, भ्रष्टाचाराविरोधातच कोणती कारवाई करत नाही, असं वक्तव्य कुमार विश्वास यांनी केलं. या व्हिडिओवरुन प्रकरणाला तोंड फुटलं.

आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्वास संघ-भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. 'आप'ने अमानतुल्ला यांना राजकीय कामकाज समितीवरुन हटवलं, मात्र विश्वास यांचं समाधान झालेलं नाही.