Gujrat News :  गुजरातमधील 24 वर्षांची क्षमा बिंदु (kshama Bindu)11 जून रोजी स्वत:सोबत लग्न करणार आहे. क्षमानं आपल्या लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. तर दुसरीकडे तिच्या या आत्मविवाहाला विरोध होत आहे.  गुजरातमध्ये पहिल्यांदाच असा आत्मविवाह होत आहे. क्षमाच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. हिंदुत्व याची परवानगी देत नाही, अशा प्रकारामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असं भाजप नेत्या सुनीता शुक्ला यांनी म्हटलं आहे. त्यांनी या लग्नावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी देखील हा एकल लग्न किंवा स्व-विवाह हा वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं. देवरा यांनी म्हटलं होतं की, आशा आहे की हा वेडेपणा भारतापासून दूर राहील.  


तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही
 भाजप नेत्या सुनीता शुक्ला यांनी म्हटलं आहे की, सिंगल मॅरेज कॅनेडियन वेब सिरीज ‘एनी विथ ई’ वरून प्रेरित आहे. एकपत्नीक विवाह हिंदू धर्माच्या विरोधात असून त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. मंदिरात अशा लग्नाला माझा विरोध आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. मी मंदिरातील एकल विवाहाविरोधात आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. असे विवाह हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असं शुक्लांनी म्हटलं आहे. 






नवरी बनायचं होतं पण लग्न करायचं नव्हतं
या निर्णयाबाबत बोलताना क्षमानं सांगितलं होतं की, मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र मला नवरी बनायचं होतं. त्यामुळं मी स्वत:शीच लग्न करायचा निर्णय घेतला. तिनं यासाठी परदेशात कुठं असं लग्न कुणी केलंय का? याचा शोध देखील घेतला. मात्र तिला तसं कुणी आढळून आलं नाही. तिनं म्हटलं की, कदाचित मी आपल्या देशातील पहिली व्यक्ती आहे जिनं आत्म प्रेमाचं एक वेगळं उदाहरण दिलं आहे.  


स्वत:वर प्रेम करते आणि म्हणूनच मी स्वत:सोबत लग्न 
क्षमा एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिनं म्हटलं की, स्व-विवाह विनाशर्त स्वत:वर प्रेम करण्याचं एक मानक असेल. हे आत्म-स्वीकृतीचं एक काम आहे. लोकं अशा व्यक्तिसोबत लग्न करतात जिच्यावर ते प्रेम करतात. मी स्वत:वर प्रेम करते आणि म्हणूनच मी स्वत:सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.  


आईवडील देखील झाले लग्नासाठी तयार
क्षमानं म्हटलं की, माझ्या या निर्णयाला काही लोकं अतार्किक मानतील. मात्र माझ्या आईवडिलांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मला या लग्नासाठी आशीर्वाद देखील दिले आहेत.  


मंदिरात करणार लग्न
क्षमानं आपल्या लग्नासाठी गोत्रीमधील एक मंदिर निवडलं आहे. या मंदिरात ती स्वत:सोबत लग्न करेल. लग्नात म्हणण्यासाठी तिनं स्वत:साठी पाच शपथा लिहिल्या आहेत. विशेष बाब अशी की, लग्नानंतर क्षमा हनिमूनला देखील जाणार आहे. ती गोव्याला हनिमूनला जाणार आहे, जिथं ती दोन आठवडे राहणार आहे.