India Wheat Exports: तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास नकार दिला आहे. तर, दुसरीकडे भारताने आता निर्यातीच्या ऑर्डर थांबवली आहे असल्याचे वृत्त आहे. भारतीय गव्हांमध्ये व्हायरस असल्याचे कारण देत तुर्कीने भारतीय गव्हाला नकार दिला होता.
वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 1.5 दशलक्ष टन गव्हाच्या निर्यातीचे अर्ज नाकारले आहेत. बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने गव्हाच्या निर्यातीसाठी लेटर्स ऑफ क्रेडिट (LCs)जारी करण्याची प्रक्रिया कठोर केली आहे. यासाठी आता अनेक टप्प्यातील अर्ज तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार, सरकारने मे महिन्यात लागू केलेल्या गव्हाच्या निर्यातीवरील बंदीच्या अनुषंगाने योग्य असलेल्या निर्यात अर्ज नियमांचे अनुकूल असतील अशाच अर्जांना एलसी दिले जात आहेत. वृत्तानुसार, सरकारने यासाठी दोन सदस्यीय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. LCs चे काम करण्याचा अनुभव असलेल्या एका एक्स-बँकरची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे.
काही देशांचा भारताचा गहू घेण्यास नकार
सरकारकडून गव्हाच्या निर्यातीबाबत कठोर पावले उचलली जात आहेत. तर, काही देशांनी भारताचा गहू घेण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीने भारतीय गव्हात रुबेला व्हायरस असला असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच्या परिणामी भारतीय गहू घेण्यास नकार दिला. हा गहू याआधी भारतातून नेदरलँड्स येथे पाठवण्यात आला होता. त्यानंतर तुर्की येथे पाठवण्यात आला. त्यानंतर जवळपास 55 हजार टन गहू इजिप्त घेणार होता. मात्र, त्यांनीदेखील त्याला नकार दिला.
निर्यात बंदी सुरू राहणार
केंद्र सरकारने सध्या तरी देशातून गव्हाच्या निर्यातीवर असलेली बंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करणे, महागाईवर नियंत्रण आणि शेजारील-गरजू देशांना गव्हाचा पुरवठा करावा यासाठी निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. सरकारने 13 मे पूर्वी लेटर्स ऑफ क्रेडिट (LC) मिळालेल्या ऑर्डर करीता निर्यात सुरू ठेवली आहे. तर, गव्हाची गरज असणाऱ्या देशांना निर्यात करण्यासाठी फक्त संबंधित देशांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.