Kolkata Airport Fire Update: कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी (14 जून) रात्री आग लागली होती. मात्र, आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना टर्मिनलच्या आतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. 


विमानतळावर लागलेल्या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोलकाता विमानतळाच्या (Kolkata Airport) अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे. आगीनंतर प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना सकाळी 9.12 च्या सुमारास घडल्याची माहिती कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना अग्निशमन दल आणि विमानतळावरी स्टाफनं सुखरूप बाहेर काढलं. 






घटनेसंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं वक्तव्य 


भारतीय विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की, नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल (NSCBI) विमानतळ कोलकाता चेक-इन एरिया पोर्टल डी येथे रात्री 9.12 च्या सुमारास आग लागली आणि धूर झाला. रात्री 9.40 पर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून चेक-इन परिसरात धुराचे लोट आढळल्यानं प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. कामकाज आता पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. 


सीआयएसएफनं आगीसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, डी पोर्टल चेक-इन काउंटरला आग लागली. टर्मिनल इमारतीतून धुर पसरल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. आग विझवण्यात आली आहे. सामान्य कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. 






काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?


नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. "कोलकाता विमानतळावरील चेक-इन काउंटरजवळ एक दुर्दैवी पण किरकोळ आग लागली." असं ते म्हणाले. तसेच, ते विमानतळ संचालकांच्या संपर्कात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सुदैवानं सर्वजण सुरक्षित असून कोणतीही दुखापत झालेली नाही. सकाळी 10.25 वाजता चेक-इन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आगीचं कारण लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.