नवी दिल्ली : देशाची फाळणी ही भारताच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना समजली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळताना भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. हे फक्त दोन देशांचे विभाजन नव्हते तर घर, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. लोकांचे नशीब एका रात्रीत बदलले, लाखो लोक बेघर झाली तर काही द्वेषाच्या तलवारीच्या सपासप वाराने संपले. कुणाचे भाऊ-बहीण सीमा ओलांडून गेले तर कुणी कुटुंब, मालमत्ता इथेच सोडून पाकिस्तानला गेले. बंधूभावाने राहणारे दोन धर्माचे लोक अचानक एकमेकांचे शत्रू झाले. या फाळणीने दोन्ही समाजाच्या लोकांच्या हृदयात द्वेषाची अशी काही दरी खणून काढली, जी आजपर्यंत भरुन निघू शकली नाही. फाळणीच्या त्या दुःखद इतिहासात 15 जूनचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण राष्ट्रीय काँग्रेसने 1947 मध्ये नवी दिल्ली येथे 14-15 जून रोजी झालेल्या अधिवेशनात फाळणीचा ठराव मंजूर केला होता. स्वातंत्र्याच्या नावाखाली इंग्रजांनी भारताला कधीही भरून न येणारी ही जखम दिली.


1896: जपानच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे 22,000 लोकांचा मृत्यू झाला.


1908: कलकत्ता शेअर बाजार सुरू झाला.


कलकत्ता स्टॉक एक्सचेंज म्हणजे कलकत्ता शेअर बाजार हा दक्षिण आशियातील दुसरा सर्वात जुना शेअर बाजार आहे. 15 जून 1908 रोजी त्याची स्थापना झाली. 


1937 : समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म


पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय समाजसेवक किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्मदिन. अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार देशात लागू व्हावा यासाठी प्रयत्न केला. 


1947: भारताच्या फाळणीची योजना काँग्रेसने स्वीकारली


ब्रिटिशांच्या गुलामीत असलेल्या भारताचे दोन देशात विभाजन (Partition of India) करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने 15 जून 1947 रोजी स्वीकारला. 3 जून 1947 रोजी माऊंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना मांडली. धर्माच्या आधारावर वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात यावा अशी मागणी मुस्लिम लीगने 1906 साली मांडली होती. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट 1946 साली कलकत्त्यात प्रत्यक्ष कृतीदिन (Direct Action Day)चे आवाहन केले. त्यांतर झालेल्या दंगलीत सुमारे 5000 लोक ठार झाले. देशात धर्मावर आधारित वाढत्या दंगलीनंतर काँग्रेसने अखेर फाळणीची योजना स्वीकारली. 


1954: युरोपातील फुटबॉल संघटना UEFA (युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन) ची स्थापना.


1994: इस्रायल आणि व्हॅटिकन सिटीमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.


1997: आठ मुस्लिम देशांनी इस्तंबूलमध्ये डी-8 नावाच्या संघटनेची स्थापना.


1999: लॉकरबी पॅन अॅम विमान अपघातासाठी लिबियावर खटला चालवण्यास अमेरिकेची परवानगी.


2001: शांघाय फाइव्हचे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असे नामकरण करण्यात आले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना सदस्यत्व न देण्याचा निर्णय.


2004: ब्रिटनबरोबरच्या अण्वस्त्र सहकार्याला राष्ट्राध्यक्ष बुश यांची मान्यता मिळाली.


2006 - भारत आणि चीनने जुना रेशीम मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला.


2008 - ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रथमच अतिनील प्रकाशाचा स्फोट करून मोठ्या ताऱ्यांची स्थिती पाहिली.