नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ई-मेलचा तपास सुरु आहे.


या ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. 'किल नरेंद्र मोदी' (Kill Narendra Modi) असा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केलं आहे. गृहमंत्रालयाने याबाबत एसपीजीलाही माहिती दिली. एसपीजीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.


राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, "एनआयएला एक ई-मेल आयडी सापडला, ज्यात काही मान्यवरांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला. ई-मेलमधील मजकुरातून असेच संकेत मिळत आहेत." एनआयएने आपल्या पत्रासोबत ई-मेलची कॉपीही जोडली आहे. तसंच गृहमंत्रालयाने यावर योग्य कारवाई करण्यास सांगितलं आहे.


वृत्तानुसार हा ई-मेल ylawani12345@gmail.com नावाच्या अकाऊंटवरुन info.mum.nia@gov.in वर पाठवला आहे. हा ई-मेल मध्यरात्री 1 वाजून 34 मिनिटांनी पाठवला आहे. मेलमध्ये नरेंद्र मोदी यांना मारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.


काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींवर एक तासात गोळ्या झाडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी ममूरा गावात राहणाऱ्या 33 वर्षीय हरभजन सिंह नावाच्या तरुणाला अटक केली होती. अटकेच्या वेळी आरोपी नशेत होता.