अलाप्पुझा : एका चोरीला आपल्या कृत्याचा एवढ पश्चात्ताप झाला की, त्याने चोरलेले सोन्याचे दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. केरळच्या अम्बालप्पुझा पोलिस स्टेशन क्षेत्रात, चोराने मालकाला केवळ दागिनेच परत केले नाहीत तर माफीही मागितली. अम्बालप्पुझाचे सर्कल इन्स्पेक्टर बीजू वी नायर यांच्या माहितीनुसार, करुमडीमधील मधु कुमार मंगळवारी संध्याकाळी आपल्या कुटुंबासह करुवट्टामध्ये त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. पण घराचं मेन गेट लॉक करायला ते विसरले. रात्री साडेदहा वाजता परतल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेलं दिसलं आणि मागचा दरवाजा उघडा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि तक्रार नोंदवली. संशयित म्हणून त्यांनी एका व्यक्तीचं नावही पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी संशयाच्या आधारावर चोरीचा तपास सुरु केला.
पण यानंतर जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. गुरुवारी सकाळी घराच्या गेटसमोर मधु कुमार यांना सोन्याचे दागिने एका कागदात गुंडाळलेले सापडले. त्यासोबतच माफीनाम्याचं एक पत्रही होतं. "कृपया, मला माफ करा. पैशांची गरज होती म्हणून मी तुमचे दागिने चोरले. पण यापुढे मी असं करणार नाही. कृपया पोलिसांकडे जाऊ नका," असं माफीनाम्यात लिहिलं होतं. यानंतर मधु कुमार यांनी पोलिसांनी याची माहिती दिली आणि आम्हाला हे प्रकरण पुढे वाढवायचं नाही, असंही सांगितलं.