चेन्नई : कुटुंबीयांनी लिंगबदलासाठी परवानगी न दिल्याने नाराज झालेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तामिळनाडूची राजधानी चेन्नईत सोमवारी ही घटना घडली.


22 वर्षीय विद्यार्थिनी फातिमा रेहानाने तिरुवनंतपुरममधील हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. फातिमाला लिंगबदल करुन पुरुष व्हायचं होतं, पण कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही, असं सांगितलं जात आहे.

फातिमा केपीएमसीची विद्यार्थिनी  
फातिमा केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. पनविलामधील मुस्लीम असोसिएशनच्या महिला होस्टेलमध्ये फातिमा राहत होती. तर तिचे आई-वडील अब्दुल रहमान आणि राफिया परदेशात राहतात. फातिमाचा भाऊदेखील परदेशात असून तिची छोटी बहिण तिरुवनंतपुरममध्ये शिक्षण घेत आहे.

कुटुंबीयांचा विरोध
कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनचे निरीक्षक एम प्रसाद यांनी सांगितलं की, "कुटुंबीयांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेला परवानगी न दिल्याने फातिमाने हे टोकाचं पाऊल उचललं. याआधी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी फातिमा एका डॉक्टरकडे गेली होती. पण कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं डॉक्टरने तिला सांगितलं. यासाठी तिने अनेकदा आई-वडिलांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला."

"फातिमाला मुलांसारखं राहायला आणि त्यांच्यासारखेच कपडे घालायला आवडत होतं," असं हॉस्टेल प्रशासनानेही सांगितलं. "तर फातिमा सोमवारी हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता," अशी माहिती पोलिसांनी दिली.