तिरुवअनंतपुरम : "दहशतवाद्यांनो, उरी हल्ला भारत कधीही विसरणार नाही," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. "भारत दहशतवादासमोर कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही," अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला खडसावलं.


उरी हल्ल्यानतंर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं.  केरळच्या कोळीकोडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

'जे बलुचिस्तान, गिलगिटला सांभाळू शकत नाही, ते काश्मीरवर दावा करत आहेत'

यावेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानवर चांगलाच घणाघात केला. "जे लोक बलुचिस्तान, गिलगिट, पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना सांभाळू शकत नाहीत, ते काश्मीरवर दावा करत आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या नेत्यांना जाब विचारावा, जे जवळ आहे, ते सांभाळण्याचा सल्ला द्यावा. तसंच पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवेल, तो दिवस दूर नाही," असंही मोदी म्हणाले.

'भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, पाकिस्तान दहशतवादी'

"आशियातील एक देश रक्तपात करत आहे, पाकिस्तान जगभरात दहशतवाद निर्यात करत आहे. शेजारच्या देशाने निर्यात केलेल्या दहशतवादांमुळे आमचे 18 जवान धारातीर्थी पडले. पाकिस्तानी जनतेने त्यांच्या सरकारला विचारावं, दोन्ही देश एकत्र स्वंतत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी. मात्र आम्ही जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडणार आहे," असा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला.

'18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही'

उरी हल्ल्यातील आमच्या 18 जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्या जवानांनी मागील काही महिन्यात 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला. आम्हाला देशाच्या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे, त्यांच्या त्यागाचा अभिमान आहे

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवेल, तो दिवस दूर नाही : नरेंद्र मोदी

जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडणारः मोदी

पाकिस्तानी जनतेने त्यांच्या सरकारला विचारावं, दोन्ही देश एकत्र स्वंतत्र झाले, पण भारत सॉफ्टवेअर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी : मोदी

दहशतवाद्यांनो कान देऊन ऐका, आम्ही उरी हल्ला कधीही विसरणार नाही : पंतप्रधान मोदी

भारत दहशतवादासमोर कधीही झुकला नाही, ना कधी झुकणार : पंतप्रधान मोदी

आशियातील एक देश रक्तपात करत आहे, पाकिस्तान जगभरात दहशतवाद निर्यात करत आहे, पंतप्रधान मोदी बरसले

भाजप बहुमताने येईल, असा विचारही केला नव्हता, जनतेने भाजपला देशाची सेवा करण्याची संधी दिली : नरेंद्र मोदी

भाजपचं सरकार गरीब जनतेला समर्पित : नरेंद्र मोदी

भारतासह जगात केरळवासियांना आदरभाव : नरेंद्र मोदी

आखाती देशांच्या दौऱ्यात मला तिथे काम करत असलेल्या माझ्या केरळच्या लोकांना भेटायचं होतं : नरेंद्र मोदी

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच जाहीर सभा