Kerala Heavy Rain: केरळमध्ये पावसाने हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोकं बेपत्ता आहेत. कोट्टायममध्ये पावसाचा सर्वात जास्त परिणाम दिसून येत आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, अल्लाप्पुझा जिल्ह्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, पावसामुळे, पठाणमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे.



मदत आणि बचाव कार्य सुरू
पावसामुळे निसर्गाच्या कहराला सामोरे जाणाऱ्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे.


कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना उधाण आले असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.


पंतप्रधान मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
आस्मानी संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी ट्विट केले, की "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी ग्राऊंडवर काम केले जात आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."




पंतप्रधान मोदींनी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी दु: ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट केले, "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती सहवेदना."


11 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.