कोची : केरळात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून परिस्थिती बिकट बनली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनीही केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.


केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही रक्कम वेणुगोपाल यांनी जमा केली आहे. केरळमध्ये 9 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात महापूर आला आहे.


वेणुगोपाल यांचे पुत्र वरिष्ठ वकील कृष्णन वेणुगोपाल यांनीही केरळसाठी 15 लाखांची मदत केली आहे. दिल्लीतील वकिलांच्या एका ग्रुपने केरळमधील पुरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तू पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी मदत निधी जमा करणाऱ्या वकिलांचं समर्थन केलं आहे.


केंद्र सरकारकडून 500 कोटींची मदत
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत मोदींची बैठक पार पडली.


पूरग्रस्तांना विविध राज्यातून मदत
महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत.


टेलिकॉम कंपन्यांकडून पुढील सात दिवस विनामूल्य सेवा
केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला आता अनेक टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य देण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.


संबंधित बातम्या  


केरळसाठी केंद्राकडून 500 कोटींची मदत


VIDEO : केरळ पूर : गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं!


केरळच्या मदतीला इतर राज्य धावले, मोदीही केरळात पोहोचले 


काँग्रेसचे आमदार-खासदार केरळसाठी एक महिन्याचं वेतन देणार