तिरुअनंतपुरम : सोशल मीडियावर केरळी दाम्पत्याविषयी खोटी माहिती वायरल करणाऱ्या आणि नववधूच्या शरीरयष्टीची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.



29 वर्षीय अनूप पी सबॅस्टियन आणि 27 वर्षांची ज्यूबी जोसेफ चार फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले होते. केरळातील कुन्नूरमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. नवदाम्पत्याचा फोटो स्थानिक वृत्तपत्रातील विवाहसंबंधी विभागात छापण्यात आला होता. त्यानंतर सुरुवात झाली या दाम्पत्याच्या मानसिक छळवादाला.

काही टवाळखोरांनी अनूप-ज्यूबी यांचा फोटो खोट्या माहितीसह सोशल मीडियावर वायरल केला. अचानक एके दिवशी अनूप-ज्यूबी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवराळ भाषेतील मेसेज आणि फोन यायला लागले. इतकंच काय, तर ज्यूबीच्या शरीरयष्टीची खिल्ली (बॉडी शेमिंग) उडवणारे मेसेजही लिहिले जात होते.

सुरुवातीला दोघांनाही हा प्रकार काय आहे, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र वस्तुस्थिती उघड झाली आणि दोघांचीही झोप उडाली. वस्तूस्थिती पडताळून न पाहता अनोळखी लोकांकडून होणारी शिवीगाळ इतकी भयंकर होती, की अनूप-ज्यूबीला पोलिसात तक्रार दाखल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

काय होता मेसेज?

'फोटोत दिसणारी महिला (ज्यूबी) 48 वर्षांची, तर तरुण (अनूप) आहे 25 वर्षांचा. महिलेची संपत्ती 25 कोटींची आहे. 101 भेटवस्तूंसह 50 लाखांचा हुंडा देण्यात आला. हे लग्न आपल्या (केरळातील) चेरुपुझामध्ये पार पडलं' असा तथ्यहीन आणि खोटा मेसेज अनूप-ज्यूबीच्या फोटोसह वायरल करण्यात आला होता.

मेसेज वायरल करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पाच जणांपैकी एकही व्यक्ती अनूप-ज्यूबीच्या परिचयातील नाही. त्यामुळे 'उचलली जीभ'च्या धर्तीवर 'उचलला फोटो आणि काहीपण लिहून पोस्ट केला सोशल मीडियावर' या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.